पुणे : स्वारगेट स्थानकातून बस पळवून नेत शहरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका घडविलेल्या संतोष माने प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या १९वर्षीय तरुणीच्या आई-वडिलांना २४ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दावा दाखल केलेल्या तारखेपासून ९ टक्के व्याजाने ही रक्कम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. सत्र न्यायाधीश आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य ए. जी. बिलोलीकर यांनी हा आदेश दिला आहे. पूजा भाऊराव पाटील (१९) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. २५ जानेवारी २०१२ रोजी हा अपघात घडला होता. पूजा दंतवैद्यक महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील भाऊराव पाटील (५०, रा. ससाणेनगर, हडपसर) व आई जयमाला (४३) यांनी ५० लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. घटनेच्या दिवशी पूजा सकाळी ८ वाजता मैत्रिणीच्या दुचाकीवर मागे बसून भारती विद्यापीठाकडे निघाली होती. त्या वेळी संतोष माने बेदरकारपणे चालवत असलेल्या एसटीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात पूजा गंभीर जखमी झाली होती. तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांनी मार्च २०१२मध्ये ५० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी दाव्यात केली होती. त्यास एसटी महामंडळाचे वकील अतुल गुंजाळ यांनी विरोध केला. घटनेच्या वेळी संतोष माने ड्युटीवर नव्हता. परवानगीशिवाय त्याने बस चालविली. त्यामुळे एसटी महामंडळ नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून २४ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
मृत तरुणीच्या पालकांना मिळणार नुकसानभरपाई
By admin | Published: November 14, 2015 3:42 AM