मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युती होणार की तुटणार याबाबत चर्चा रंगली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असताना युतीबद्दलचा पेच कायम आहे. त्यामुळे ‘युतीचा निर्णय लवकरच घ्यावा लागेल; नाहीतर निवडणुका होऊन जातील,’ असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. शिवसेनेसोबत युतीसाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याची चर्चा असली तरी भाजपाकडून कोणताच प्रस्ताव आलेला नाही. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेकडून पडताळणी केली जात आहे. ‘मातोश्री’वर मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती घेऊन ‘एकला चलो’चे संकेत दिले. मुंबई महापालिकेसह इतर ठिकाणीही शिवसेनेसोबत युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी त्याबाबत बैठक झाल्याचेही सांगण्यात येत होते. (प्रतिनिधी)
निवडणुका संपण्यापूर्वी युतीचा निर्णय घ्या - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 4:56 AM