मुंबई : अकरावी प्रवेश घेताना विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास होणार नाही, यासाठी ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ कशी होईल याचा विचार करून तसे धोरण निश्चित करा व त्याचे प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले.महत्त्वाचे म्हणजे आॅफलाइन प्रवेश पद्धतीलाही न्यायालयाने विरोध केला. आॅनलाइन प्रवेशासोबत आॅफलाइनचाही पर्याय असल्याने काही विद्यार्थी व महाविद्यालये जाणीवपूर्वक आॅनलाइन प्रवेशात सहभागी होत नाहीत. त्यामुळे आॅफलाइन पद्धतच रद्द करून सर्व जागा आॅनलाइन पद्धतीनेच भरल्या गेल्या पाहिजेत, असे मतही न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. विशेष म्हणजे पुण्यात प्रवेशाची चौथी फेरीही आॅनलाइन पद्धतीनेच होणार असून मुंबईत आॅफलाइन पद्धतीने प्रवेश होणार आहेत, असे सरकारी वकील दिनेश खैरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर पुण्याला वेगळी वागणूक व मुंबईसाठी वेगळा नियम का ठेवण्यात आला आहे, असा सवाल न्यायालयाने केला. तसेच मुंबई शिक्षण उपसंचालकांनी चौथी फेरी आॅफलाइन पद्धतीने होणार असल्याचे कसे जारी केले, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अकरावी प्रवेशाचे धोरण निश्चित करा - हायकोर्ट
By admin | Published: July 18, 2015 2:27 AM