मीरारोड - मीरा भाईंदर हे १९ महसुली गावांनी शहर बनले असून ह्या गावातील गावठणात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना घरदुरुस्ती परवानगी साठी समिती नेमून धोरण ठरवा अशी मागणी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आताचे मीरा भाईंदर शहर हे मूळच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या १९ महसुली गावांचे आहे . जुन्या गावठणातील अनेक घरे जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी अत्यावश्यक बनली आहे . परंतु भूमिपुत्रांना त्यांच्या राहत्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेत परवानगी मिळत नाही . त्यासाठी अनेक अटी , कायदे - नियम दाखवले जातात . परवानगी मिळत नसल्याने नाईलाजाने भूमिपुत्रास त्याच्या घराची दुरुस्ती परवानगी शिवाय करून घ्यावी लागत आहे.
परवानगी शिवाय दुरुस्ती काम करताना पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही तथाकथित पत्रकार , माहिती अधिकार कार्यकर्ते तक्रारी करून जबरदस्ती वसुली करत आहे . जेणे करून स्थानिकांच्या घरांची दुरुस्ती कामे रखडून त्यांची अडवणूक केली जात असल्याचे वैती यांनी म्हटले आहे.
शहराच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने आता स्थानिक भूमिपुत्र मूठभर राहिले असून त्यांना इतरांसारखे दुसरीकडे गाव नाही . त्यामुळे अश्या तक्रारी करणाऱ्यां कडे मालमत्तेचे वडिलोपार्जित हक्क , खरेदीखत , करारनामा , न्यायालयीन दावे असल्या खेरीज दखल घेऊ नये . गावठाणातील घरांच्या बांधकामां साठी समिती बनवून त्याचा अहवाल महासभेत ठेऊन धोरण निश्चित करावे अशी मागणी वैती यांनी केली आहे.