मुंबई : वांद्रे येथील एका कार्यालयाची जागा ताब्या घेण्यासाठी जागेच्या मालकाला धमकावून व गुंड पाठवून जबरदस्ती केल्याप्रकरणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्यावर गुन्हा नोंदवायचा की नाही, याबाबत सात दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.वांद्रे येथील ३६, टर्नर रोड या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील कार्यालयाची जागा धमकी देऊन रिकामी करण्याचा प्रयत्न नीतेश राणेंचे गुंड करत असल्याचा आरोप कार्यालयाच्या मालकाने केला आहे. या प्रकरणी नितेश राणे व त्यांच्या गुंडांवर एफआयआर नोंदवण्यात यावा, यासाठी कार्यालयाच्या मालकाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी केसमध्ये दिलेल्या निकालानुसार तक्रार केल्यानंतर पोलिसांना तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे. त्यानुसार तुम्ही (पोलीस) एफआयआर नोंदवणार की नाही, याबाबत सात दिवसांत निर्णय घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. तर याचिकाकर्ते रोहित कंधारींना संरक्षण मागण्यासाठी संबंधित प्रशासनापुढे अर्ज करण्याची सूचना केली. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे माझ्या जिवाला, कुुटुंबाच्या जिवाला आणि कार्यालयाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे व पोलीस संरक्षण देण्याचा आदेश द्या,’ अशी मागणी कंधारी यांनी याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
नीतेश राणेंवर गुन्हा नोंदविण्याबाबत निर्णय घ्या - हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 4:21 AM