Corona Vaccination: मोफत लसीकरणाचा निर्णय कधी?; अजित पवार म्हणाले, जरा थांबा; नाहीतर तुम्हीच म्हणाल....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:06 PM2021-04-27T13:06:26+5:302021-04-27T13:07:06+5:30
Corona Vaccination: कोरोना लसीकरणाचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता; उद्या होणाऱ्या कॅबिनेटची बैठक
मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढत असताना राज्यातील आकडेवारीनं काहीसा दिलासा आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारनं लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या याबद्दलचा निर्णय होऊ शकेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
मोफत लसीकरणाचा निर्णय कधी होणार, याबद्दल पत्रकारांनी अजित पवारांकडे विचारणा केली. त्यावर उद्या कॅबिनेटची बैठक आहे. त्यात मोफत लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो. १८ वर्षांवरील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्याबद्दलच्या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली आहे. याबद्दल उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकेल, असं उत्तर पवार यांनी दिलं. याबद्दल अधिक प्रश्न विचारले असता, तुम्ही २४ तास थांबा. तुम्हाला माहिती मिळेल. नाही तर उद्या तुम्हीच म्हणाल, अजितदादा एक बोलले होते आणि कॅबिनेटनं दुसराच निर्णय घेतला, असं अजित पवार म्हणाले.
लसीकरणाला गती मिळणार, रशियाची Sputnik V लस 1 मे रोजी भारतात पोहोचणार
मोफत लसीकरणाबद्दलचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाऊ शकेल, असं आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनीदेखील पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यातील जनतेच्या लसीकरणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. आम्हाला १२ कोटी लसींचे डोसेज हवे आहेत, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. लसींच्या किमती करण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करा, अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण देशातच ऑक्सिजनचा तुटवडा असल्यानं यासाठी आम्ही ग्लोबल टेंडर काढणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.