मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडलीची पत्नी साजिया गिलानी आणि मित्र डॉ. तहव्वूर राणा यांना सहआरोपी करण्याचा अर्ज अबू जुंदाल याने विशेष न्यायालयात केला आहे. मात्र, डेव्हिड हेडलीची उलटतपासणी पूर्ण झाल्यानंतरच या अर्जावर निर्णय घेऊ, असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले.मुंबईवर हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांना हिंदी शिकवणाऱ्या अबू जुंदालने हेडलीच्या साक्षीचा आधार घेत, हेडलीची पत्नी साजिया गिलानी आणि त्याचा मित्र तहव्वूर राणा यांनाही सहआरोपी करण्याचा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला. जुंदालच्या या अर्जावर तातडीने निर्णय घेणे गरजेचे नाही. त्यामुळे डेव्हिड हेडलीची उलटतपासणी पूर्ण झाल्यानंतरच अर्जावर सुनावणी घेऊ, असे न्या. जी. ए. सानप यांनी स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीच्या वेळी हेडलीने मुंबईवरील हल्ल्यानंतर ई-मेलवरून अभिनंदन केले, असे सांगितले, तसेच हेडलीची खरी ओळख लपवण्यासाठी डॉ. तहव्वूर राणा याने भारतात इमिग्रेशन सेंटर सुरू करण्यास हेडलीची मदत केली. हेडलीची पत्नी आणि डॉ. राणा हे दोघेही या कटात सहभागी असल्याने त्यांनाही या खटल्यात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी अबू जुंदाल याने अर्जाद्वारे केली आहे. आता २२ मार्चपासून अबू जुंदालचे वकील वहाब खान त्याची उलटतपासणी घेण्यास सुरुवात करतील. (प्रतिनिधी)- मुंबई हल्ल्याप्रकरणी हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयाने ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मुंबई न्यायालयात त्याची साक्ष व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवण्यात आली. हेडलीने आपल्या साक्षीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
हेडलीच्या साक्षीनंतरच अबूच्या अर्जावर निर्णय
By admin | Published: March 20, 2016 4:17 AM