संदीप वाडेकर- पुणे : राज्यातील आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या आशयाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्रालयाने स्पष्ट केले. ‘लोकमत’ ने यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सैनिकांना मालमत्ता करातून माफी देण्याचे जाहीर केले होते.राज्याचे कृषि आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनीही या मागणीसंदर्भात पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी माजी सैनिकांनी जिवाची पर्वा न करता नि:स्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता त्यांचे मनोबल उंचावून उचीत सन्मान देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला. असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. अशा करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले...........................
संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवापदक धारक तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे. आता ही तरतूद व्यापक करून राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- हसन मुश्रीफ,ग्रामविकासमंत्री.
..............................................
माजी सैनिकांना करातून सूट राज्य शासनाने मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद करून सैनिकांचा सन्मान केला आहे.देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या विधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या तरतुदीनुसार आधार मिळाला आहे. शक्ती महादेव साबळे, माजी सैनिक.