रवींद्र देशमुख
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेली शिवसेना-भाजप युतीची चर्चा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. किंबहुना निश्चित झाली असून केवळ घोषणा बाकी असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अनेक मतदार संघातील उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. तर अनेकांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यात घनसावंगी मतदार संघातून हिकमत उढान यांना सेनेची उमेदवारी निश्चित झाली आहे. युतीमुळे उढाण यांना बळ मिळणार असले तरी आहे. राजेश टोपे यांचा मजबूत गड असलेल्या घनसावंगीचा पाडाव करणे उढाण यांच्यासाठी तितकेसे सोपे नाही. पण बदललेल्या स्थितीमुळे राजेश टोपे यांचा कस लागणार आहे.
घनसावंगी मतदार संघ मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असून राजेश टोपे चौथ्यांदा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर याआधीच्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या पदरी निराशाच आली आहे. 2009 मध्ये अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला होता. तर 2014 मध्ये हिकमत उढान यांना पराभव पत्करावा लागला होता.
2014 मध्ये युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा राजेश टोपे यांनाच झाला होता. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे विलास खरात दुसऱ्या स्थानी होते. तर तिसऱ्या क्रमांकवर उढाण होते. भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतविभाजनामुळे राजेश टोपे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. परंतु, यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असून भाजपची मते मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे उढाण यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र यासाठी भाजपने युती धर्म पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मायक्रो प्लॅनिंगमध्ये टोपे आघाडीवरमाजीमंत्री राजेश टोपे यांचा घनसावंगी मतदार संघावर स्ट्राँग होल्ड आहे. कुशल संघटनामुळे त्यांनी विरोधकांना संधीच दिली नाही. या व्यतिरिक्त मायक्रो प्लॅनिगच टोपे यांच्या विजयाचे गमक मानले जाते. समर्थ आणि सागर साखर कारखाने, सूतगिरणी, सहकारी बँक आणि शिक्षण संस्थांचे जाळे यामुळे टोपे मतदार संघात सतत संपर्कात असतात. या सर्व आव्हानातून हिकमत उढाण यांना मार्ग काढायचा आहे. एकूणच घनसावंगी मतदार संघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.