मुंबई : शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या, दि.२६ ला सायंकाळी होणाऱ्या पक्षमेळाव्यात करण्याची शक्यता आहे. कालपर्यंत युतीसाठी अनुकूल असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वबळाच्या मूडमध्ये असल्याच्या वृत्ताने युतीचे भवितव्य अधिकच टांगणीला लागले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुखांचा मेळावा गुरुवारी सायंकाळी गोरेगावच्या एनएसई ग्राऊंडवर होणार आहे. ‘आपण युतीबाबत २६ तारखेला सविस्तर बोलू,’ असे ठाकरे यांनी आधीच जाहीर केले असल्याने उद्याच्या त्यांच्या या मेळाव्यातील भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस हे कालपर्यंत, ‘युती झाली पाहिजे’, यासाठी आग्रही होते. तथापि, आता ते ‘युती नाही झाली तरी हरकत नाही’, अशा मूडमध्ये असल्याचे म्हटले जाते. युती करून लढलो तर भाजपाला शिवसेनेपेक्षा कमीच जागा मिळतील. त्यापेक्षा २२७ जागा लढून पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळविण्यासाठी प्रयत्न का करू नये, असा त्यांचा विचार असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या तर भाजपाचा पहिला महापौर बसू शकेल, असा विचार आता प्रबळ (पान १ वरून) झाला आहे. मुख्यमंत्र्यांचा सध्याचा मूड हा निर्णयात बदलला तर युती होणार नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील युती करू नये, या मताचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे स्वबळावरच लढले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणाऱ्या मुंबईतील भाजपा नेत्यांना आज अचानक बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात उद्याच्या मेळाव्याआधी चर्चा होऊन काही मार्ग निघेल का याकडेही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. युती व्हायचीच असेल तर भाजपाला ११४ जागांचा आग्रह सोडावा लागेल आणि शिवसेनेला साठ जागांवरून पुढे सरकावे लागणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये आज बोलणी झाली नाही. युतीबाबत ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे शिवसेनेचे नेते खा.अनिल देसाई म्हणाले. ‘युती करू नये’ या भूमिकेप्रत ठाकरे आले असून उद्या एखादा चमत्कारच युती वाचवू शकेल, असे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी ११४ पेक्षा पाचपंचवीस कमी जागा स्वीकारुन युती केली तर भाजपात नाराजी पसरेल आणि १०० पेक्षा अधिक जागांवर ते ठाम राहिले तर शिवसेना युती करणार नाही. त्यापेक्षा स्वबळावर लढणेच योग्य राहील का या बाबत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशिरापर्यंत भाजपाच्या मुंबईतील नेत्यांशी ‘वर्षा’वर चर्चा केल्याची माहिती आहे. (विशेष प्रतिनिधी)
युतीचा आज होणार फैसला
By admin | Published: January 26, 2017 5:09 AM