ठाणे : बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा नगरसेवकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी २२ फेब्रुवारीला एकाच दिवशी घेण्याचा निर्णय ठाणे न्यायालयाने घेतला.उपरोक्त प्रकरणातील आरोपी नजीब मुल्ला यांना अलीकडेच जामीन मंजूर झाला. परमार आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष-नगरसेवक नजीब मुल्ला, मनसेचे माजी गटनेते सुधाकर चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरोधात शहर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. चौघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सुरुवातीला मुल्ला यांच्या वकिलांनी दोन वेळा युक्तिवाद केल्यानंतर चौघांच्या अर्जांची सुनावणी स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. त्यानुसार, त्यांना वेगवेगळी तारीखही देण्यात आली. आता उर्वरित तिघांच्या जामिनाबाबत सोमवारी निर्णय अपेक्षित आहे. बुधवारी हणमंत जगदाळे यांच्या सुनावणीला सुरुवात होणार होती. त्यापूर्वी सरकारी वकील राजा ठाकरे यांनी एकाच दिवशी ती घेण्याची विनंती न्यायमूर्तींनी मान्य केली.
तिघांच्या जामिनावरील निर्णय सोमवारी
By admin | Published: February 18, 2016 6:55 AM