लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत. शनिवार, १५ जुलै रोजी एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाचा शेवटचा दिवस आहे. १० दिवस मुदतवाढ देऊनही निकाल जाहीर न झाल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. यंदापासून मुंबई विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिले. त्यानुसार, मुंबई विद्यापीठात कामकाज सुरू झाले. या वेळी कुलगुरूंनी निकाल लवकर लागतील, असे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण आत्तापर्यंत निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एलएलबीच्या प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ जुलै होती, परंतु ही मुदत १० दिवसांनी वाढविली. तसेच निकाल जाहीर झालेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे सीईटीचे गुण ग्राह्य धरावेत आणि विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली होती.
एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेवर आज होणार निर्णय
By admin | Published: July 15, 2017 4:24 AM