नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीकडून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी आरोपी भाग्यश्री वासनकर, विनय वासनकर व अभिजित चौधरी यांच्या जामिनावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राखून ठेवला आहे.न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्यासमोर शुक्रवारी प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. भाग्यश्रीने नागपुरातील अंबाझरी व अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी दोन वेगवेगळे अर्ज सादर केले आहेत. विनयनेही असेच दोन अर्ज केले होते. काही दिवसांपूर्वी त्याला अमरावतीतील गुन्ह्यात जामीन मिळाला. त्याचा नागपुरातल्या गुन्ह्यातील अर्ज प्रलंबित आहे. अभिजितने अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. या सर्व अर्जांवर एकत्र सुनावणी झाली. (प्रतिनिधी)जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजच्या जामीन अर्जावरही उच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला. शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार बजाजकडे ४१४ कोटी ९ लाख ९३ हजार ७८६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. बजाजने शिक्षक व लिपिकांकडून नोकरी देण्यासाठी २५ लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली आहे. तसेच, तो विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये संगणक शुल्क वसुल करीत होता. त्याच्याकडे २,५२५.३४० ग्रॅम सोने आढळून आले आहे.
भाग्यश्री वासनकर यांच्या जामिनावर निर्णय राखीव
By admin | Published: December 19, 2015 1:54 AM