कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची नुकतीच झालेली द्विवार्षिक सर्वसाधारण सभा रद्द ठरवून त्याजागी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. यासह येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका आपल्या अध्यक्षतेखाली घ्याव्यात, अशी मागणी कोल्हापुरातील सभासदांनी शुक्रवारी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.हे निवेदन देण्याअगोदर सभासदांनी महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन सभेचा इतिवृत्तांत लिहिला आहे की, नाही याची पाहणी केली. यावेळी व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांच्याकडे विचारणा केली. यावेळी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बुधवारी (दि. ६ जानेवारी) शाहू स्मारक भवन येथे झालेली सभा बेकायदेशीर ठरवून येत्या काही दिवसांत विशेष सभा बोलवावी. याकरिता धर्मादाय आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. यासह निवडणूक कार्यक्रमही आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घ्यावा. मुंबईत शुक्रवारी सायंकाळी रवींद्र नाट्यमंदिर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी बोलविण्यात आलेली बैठकही रद्द करावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दुपारी धर्मादाय आयुक्तांना सभासदांनी निवेदन दिले आहे. यावेळी अभिनेता प्रमोद शिंदे, रणजित जाधव, किशोर सुतार, रवी गावडे, शरद चव्हाण, सचिन वारके, शाम काणे, प्रसन्न घोडके, अशोक कांबळे, विजय ढेरे, बबन बिरांजे, सुरेश लाड, संतोष मोहिते, अरुण चोपदार-भोसले, मधुकर चव्हाण, विजय शिंदे, रामराव जाधव उपस्थित होते..‘विशेष सभा’ अशी बोलाविता येणारचित्रपट महामंडळाच्या घटनेनुसार ‘अ‘ वर्ग सभासदांच्या एकतृतीयांश सभासदांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी सह्यांनिशी मागणी केल्यास ‘विशेष सभा’ बोलाविता येते, अशी तरतूद घटनेत आहे. सध्या क्रियाशील ‘अ’ वर्ग सभासद साडेसात हजारांच्या आसपास आहेत, अशी माहिती बैठकीत कोल्हापूर शाखा व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांनी सभासदांना दिली.
चित्रपट महामंडळाची सभा रद्द ठरवावी
By admin | Published: January 09, 2016 1:03 AM