मुंबई : तोट्यात असतानाही विठ्ठलवाडी आगारातील कारभार तसाच सुरू ठेवल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका एसटीला बसण्यास सुरुवात झाली आणि उशिराने शहाणपण सुचलेल्या एसटी महामंडळाने यातील कार्यशाळा विभाग दुसऱ्या आगारात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. तोटा होत असल्याने विठ्ठलवाडी आगारातील कार्यशाळा विभाग नऊ वर्षांपूर्वीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र नऊ वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास एसटीलाच उशीर झाल्याने तोटा वाढण्यास एसटीच जबाबदार ठरली आहे. तोटा होत असल्याने विठ्ठलवाडी आगार बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आणि या परिसरातील स्थानिक तसेच आगारातील कर्मचाऱ्यांना एकच धक्का बसला. मुळात या आगारातील कार्यशाळा विभाग बंद करून तो जवळच्याच आगारात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. विठ्ठलवाडी आगारातील नियमित वाहतूक सेवा तशीच राहणार असल्याचेही सांगण्यात आले. गेल्या १० वर्षांत तर ४३ कोटी रुपये तोटा या आगाराचा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच नऊ वर्षांपूर्वी हा कार्यशाळा विभाग बंद करून तो स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय झाल्यानंतरही एसटी महामंडळाकडून ठोस पाऊल उचलण्यात आले नाही आणि तोटा वाढत जाताच आगारातील यांत्रिक विभाग हलवण्याचा निर्णय घेतला गेल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विठ्ठलवाडी आगार बंद करण्याचा निर्णय ९ वर्षांपूर्वीचा
By admin | Published: July 02, 2014 4:33 AM