लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय बुधवारी घेतला जाणार आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विक्सचंद्र रस्तोगी, तंत्र हशिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते.
मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये सुरू ठेवणे कितपत योग्य राहील, याचा अभिप्राय कुलगुरूंनी सादर करावा, अशा सूचना मंत्र्यांनी ३१ डिसेंबर रोजी तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत दिल्या होत्या. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने मंगळवारी तातडीने बैठक बोलावली होती.
वसतिगृह सुरू करण्याची मागणी, पण ?विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व विद्यापीठांना आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याची सूचना केली आहे. मात्र मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांना याचा विसर पडला आहे. अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत असून वसतिगृह सुरु करण्याची मागणी करीत आहेत. पीएचडी करणाऱ्या तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू नसण्याचा प्रचंड त्रास होत असून यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. मात्र सद्यस्थितीत वसतिगृह सुरु करण्यासंबंधातील निर्णय कितपत योग्य असेल यावर शंका उपस्थित होत आहे.