मुंबई: महाराष्ट्राच्या प्रगतीवर दूरगामी परिणाम करणारे निर्णय स्व. वसंतदादा पाटील यांनी घेतले. शिक्षणाचा विस्तार करण्याचा त्यांचा निर्णय असाच दूरगामी व प्रागतिक होता. वसंतदादा यांचे नाव देशाच्या उत्तुंग नेत्यांमध्ये समाविष्ट आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतदादांच्या कार्याचा गौरव केला.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने लिखीत ‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा’ या आॅडिओ व डिजिटल बुकचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते.महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, परिवहन राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, संपादक राजा माने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे मंचावर होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘राजा माने यांनी डिजिटल व आॅडिओ बुकच्या माध्यमातून वसंतदादांचे चरित्र जगभर पोहोचविले आहे. वसंतदादांच्या जन्मशताब्दी माध्यमातून त्यांच्या गौरवाचा ठराव विधानसभेत मांडण्याची संधी मला मिळाली. त्यानिमित्ताने दादांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा मला अभ्यास करता आला, पण अप्रकाशित अनेक प्रसंग माने यांच्या आॅडिओ व डिजिटल बुकमुळे समाजापुढे येतील.दादा हे स्वत:च्या विचाराने काम करणारे नेते होते. मंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाच्या हितासाठी नियमात असेल तर नियमानुसार किंवा नियमात बसवून काम करण्याचे अधिकाºयांना आदेश दिले होते. पूर्वी राज्यात दरवर्षी दोन हजार अभियंते पदवी घेऊन बाहेर पडायचे, पण वसंतदादांनी शिक्षण विस्ताराचा निर्णय घेतल्यामुळे दीड लाख अभियंते पदवी घेऊन नोकरी, व्यवसाय करू लागले. त्यांचा हा निर्णय प्रागतिक होता.राजेंद्र दर्डा म्हणाले, वसंतदादा यांचा पिंड कार्यकर्त्याचा होता. जनतेची नाडी त्यांना ठावूक होती. जलयुक्त शिवाराचे आज काम सुरू आहे, पण दादा मुख्यमंत्री असताना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे अभियान यशस्वीपणे राबविले गेले. खासगी क्षेत्रातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी दिली. शिवाय अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांच्यानेतृत्वाखालील समिती नेमून प्रादेशिक अनुशेष म्हणजे काय ते राज्याला ठावूक करून दिले. दादांसारख्या स्वातंत्र्य लढ्यातील महायोद्ध्याच्या चरित्राला अनेक कंगोरे आहेत. जे मांडणे सोपे नव्हते, पण राजा माने यांनी ते ओघवत्या भाषेत लिहिले आहे.महसूलमंत्री पाटील म्हणाले, दादांनी खासगी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजचा निर्णय घेतला, त्याला आम्ही जास्तीच्या फीमुळे विरोध केला होता. पण दादांचा निर्णय सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचा होता, हे नंतर सिद्ध झाले. राजा माने यांनी सर्वार्थाने वसंतदादांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. पाटील यांनीमातृभूमी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली.राजा माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. आभार अविनाश सोलवट यांनी मानले. ज्योती आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.
वसंतदादांचा शिक्षण विस्ताराचा निर्णय दूरगामी, मुख्यमंत्र्यांकडून कार्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:27 AM