- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा काढून शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा ‘योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोलावले आणि आज संपकरी शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीशी चर्चा करून कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांना कर्जमाफीचे श्रेय मिळू न देण्याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली. कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करताना विरोधकांच्या मागणीला मुख्यमंत्री झुकल्याचे कोणतेही चित्र समोर येणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेतला हा संदेश या निमित्ताने त्यांनी दिला. कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लगेच जाहीर का केला नाही, चार महिन्यांनी तो अमलात येईल, असे का म्हटले अशी टीका करून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीचा निर्णय आज घेऊन त्याची उद्यापासून अंमलबजावणी करणे शक्य नसते. म्हणून मी चार महिन्यांचा कालावधी मागून घेतला. वित्त विभागाचे प्रधान सचिव डी.के.जैन हे कर्जमाफी दिलेल्या काही राज्यांमध्ये अभ्यास करून आले. कर्जमाफी दिल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की तसे सांगता येणार नाही. आत्महत्या काही प्रमाणात नक्कीच कमी होतील आणि त्या बंद व्हाव्यात असेच कुणालाही वाटेल पण पूर्वेतिहास तसा नाही. शेतीचा शाश्वत विकास हाच त्यावरील अंतिम पर्याय आहे आणि राज्य सरकार त्यासाठी उपाययोजना करीत आहे.