नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या जागा जिंकून आणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत असून सरकार स्थापन्याच्या तयारीला लागले आहेत. या अनोख्या शिवआघाडीचा फायदा तिन्ही पक्षांना होणार असला तरी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसच्या संघटनाला मरगळ आली होती. परंतु, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्दावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकसभा निवडणूक राफेलच्या मुद्दावर लढवली. मात्र पुलवामा हल्ला आणि राष्ट्रवादाची आलेली लहर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपने मोठा विजय मिळवत स्वबळावर सत्ता मिळवली. त्यानंतर राज्यात काँग्रेसला गळती लागली.
लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष अनेक राज्यात कमकुवत झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसमध्ये थांबण्यासही नेते तयार नव्हते. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यातच काँग्रेसला सत्तेत बसण्याची संधी निर्माण झाली.
राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मोठ्या पडझडीनंतर मुसंडी मारली. त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा फारशी गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे बहुतांशी आमदार हे त्यांच्या स्वत:च्या बळावर निवडून आले. आता काँग्रेसला सत्तेत जाण्याची संधी मिळाली आहे. सत्ता असली की, इतर निवडणुका जिंकण्यात अडचणी येत नाहीत. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांतून हे दिसून आले. आता राज्यातही काँग्रेसला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेसचा निर्णय राज्य काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.