ठाणे : ठाणे महापालिकेतील गावदेवी मैदान येथील विस्थापित झालेल्या सफाई कामगारांना इतर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या सेवा निवासस्थानाचे दरमहा घरभाडे ५० टक्के याप्रमाणे वसूल केले जात आहे. ते पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे सादर करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी प्रशासनाला दिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, वाल्मीकी समाजातील रहिवाशांचे हक्काच्या घरासाठी सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले.सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी बुधवारपासून या रहिवाशांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. याबाबत, महापौरांनी आपल्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक आयोजित करून याबाबत चर्चा केली. या बैठकीस स्थायी समिती सभापती संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, उपायुक्त मुख्यालय संजय निपाणे, सहायक संचालक नगररचना प्रदीप गोहिल, उपायुक्त (स्थावर) संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले तसेच महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाल्मीकी समाजातील घरांबाबत लवकरच निर्णय
By admin | Published: April 26, 2016 4:14 AM