मुंबई - महाविकास आघाडीत सामील तिन्ही राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे वचन दिले होते. तसेच महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये देखील मुस्लिमांना आरक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले होते. आता त्या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षण लागू करताना मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते. सच्चर समितीच्या अहवालानंतर ते आरक्षण लागू करण्यात आले होते. न्यायालयाने देखील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवण्यास मंजुरी दिली होती. मात्र 2014 नंतर भाजप सरकारने मुस्लीम आरक्षण रद्द केल्याचे मलिक यांनी सांगितले.
दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या जाहीरनाम्यात मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात वचन देण्यात आलेले आहे. सध्या तरी यावर काहीही निर्णय झालेला नाही. मात्र हे आरक्षण लागू करण्यासाठी वेगाने पावले उचलणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.