मुंबई : एसटी महामंडळाच्या माध्यमातून शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रवासी सवलतीसाठी, स्मार्ट कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक नसलेल्या स्मार्ट कार्डधारक प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. यासंबंधीची घोषणाच परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पुरस्कारप्राप्त खेळाडू अशा २४ सामाजिक घटकांना प्रवासी तिकिटात सवलत मिळते. या सवलतीमुळे सुमारे ३९ कोटी रुपये सरकार एसटी महामंडळाला देते. मात्र, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांचे खोटे ओळखपत्र बनवून,प्रवासी सवलतीचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. एसटी वाहकांनी संबंधित आगार नियंत्रकाकडे याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर वाहक आणि बेकायदेशीरपणे सवलत घेणारे प्रवासी यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एसटी प्रशासनाकडे ओळखपत्र आणि स्मार्ट कार्डची वैधता तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.बेकायदेशीर प्रवासी सवलत घेणाºयांना प्रवाशांचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी, आधार क्रमांक जोडलेल्या स्मार्ट कार्डला सवलत देण्यात येणार असल्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांसह अन्य मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्ट कार्डमुळे आॅनलाइन शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार क्रमांक असलेल्या स्मार्ट कार्डधारकांमुळे लाभार्थी प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.प्रवाशांना मिळणार चार महिन्यांची मुदतआधार क्रमांक स्मार्ट कार्डला जोडण्याच्या निविदा सात दिवसांच्या आत काढण्यात येणार आहेत. निविदा अंतिम झाल्यानंतर, सुमारे चार महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डला आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
स्मार्ट कार्डला ‘आधार’ अनिवार्य, एसटी महामंडळाचा निर्णय : दिवाकर रावते यांनी केली घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 5:31 AM