पुणे : निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत प्रादेशिक सूडबुद्धीने मोदी सरकार सर्व निर्णय घेत आहे. त्यांचा खोटेपणा व ढोंगबाजी उघड होत चालली असून, लोक आता त्यांना जाब विचारू लागतील, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाच्या केंद्र व राज्यातील सरकारवर हल्ला चढविला. उत्तर प्रदेश व पंजाबमधील निवडणुकांत पैशांचा सुलभपणे वापर करता यावा, यासाठीच नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २४) होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा निषेध म्हणून काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने स्वारगेट चौकात शुक्रवारी सकाळी मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. ‘प्रस्ताव आमचा, प्रयत्न आमचे, त्यामुळे आता भूमिपूजन व उद्घाटनही आमचेच’ असे समर्थन पक्षाच्या वतीने करण्यात आले. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना सरकारच्या उपक्रमांचे उद्घाटन करण्याचा अधिकार असतोच, मात्र त्यांची धडपड श्रेय घेण्याची आहे व ती आम्हाला उघड करायची असल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मेट्रोसंबंधी कसे निर्णय घेण्यात आले, याची तारीखवार सविस्तर माहितीही त्यांनी दिली.चव्हाण म्हणाले, ‘‘पुण्याचा प्रस्ताव कधीच मंजूर झाला होता. त्याच्याबरोबरच नागपूरचा प्रस्ताव मंजूर व्हावा असे आम्ही ठरविले होते, मात्र त्यांनी सत्तेवर येताच नागपूरच्या प्रकल्पाला गती दिली. यामागे पुणे व पश्चिम महाराष्ट्राला काही मिळू नये असा विचार होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अंमलात आणला. प्रादेशिकपणातून सूडबुद्धीने त्यांचे काम सुरू आहे.’’ पुणेकरांनी व मुंबईकरांनीही याचा विचार करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचीही या वेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)
मोदी सरकारचे निर्णय सूडबुद्धीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 4:23 AM