मुंबई- राज्यामध्ये मंगळवारपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहे. राज्यात पेट्रोल 2 रूपये तर डिझेल 1 रूपयाने स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
या निर्णयामुळे 2 हजार 15 कोटीचं नुकसान होणार आहे. पेट्रोलचे दर कमी केल्याने 940 कोटी, तर डिझेलचे दर कमी केल्याने 1 हजार 75 कोटींचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास 3 हजार 67 कोटींची घट अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार काटकसरीतून घट भरुन काढणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये कपात करत सर्वसामान्य जनतेला दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली. पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी आणि डिझेल प्रतिलिटर एक रुपयानं स्वस्त करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवरुन दिली होती. त्यानंतर आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकित त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मंत्रिमंडळातील या निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून हे नव दर लागू होतील.
गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन विरोधकांनी सरकरला चांगलेच अडचणीत पडले होतं. इंधन दरवाढीबाबत झालेल्या चहूबाजूच्या टीकेनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेल्या गुड न्यूजमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.