पुणे : वादग्रस्त ठरलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालामध्ये पुनर्स्थापित करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून याचा निर्णय घेतला जाणार आहे.आमदार मेधा कुलकर्णी यांनी नुकतेच महापौरांना पत्र दिले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अतिशय अपमानास्पदरित्या काढून दुर्लक्षित अवस्थेमध्ये पडलेला आहे, हा पुतळा सन्मानाने पुनर्स्थापित करावा ,अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी या पत्रामध्ये केली आहे. त्याचबरोबर संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळाही त्वरीत बसविण्याची मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे. यापार्श्वभूमीवर मुक्ता टिळक यांनी सोमवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कुलकर्णी यांनी केलेली दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीचे पत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला आहे, त्यांच्याकडून याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे टिळक यांनी सांगितले. लाल महालामध्ये बसविण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव यांच्या पुतळयाला संभाजी ब्रिगेडसह अनेक राजकीय पक्ष व संस्था, संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या मागणीनुसार हा पुतळा लाल महालातून हटविला गेला. (प्रतिनिधी)
पुतळ्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार
By admin | Published: March 28, 2017 3:21 AM