मुंबई : मुंबई महापालिकेसह दहा महापालिकांवर वर्चस्व कोणाचे आणि २५ जिल्हा परिषदांचा कौल कोणाकडे याचा फैसला उद्या (दि.२३) होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेतील निकालाकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष लागले आहे. सोबतच उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे, शिवसेनेचा गड राहिलेले ठाणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेले नाशिक, राष्ट्रवादीच्या वर्चस्व असलेले पिंपरी-चिंचवड, दक्षिण महाराष्ट्राचे प्रमुख शहर असलेले सोलापूर, विदर्भातील अमरावती आणि अकोला तसेच पप्पू कलानींमुळे पुन्हा एकदा चर्चेत असलेले उल्हासनगर या शहरांचा कौलही उद्या स्पष्ट होणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागावर पकड कोणत्या पक्षाची या प्रश्नाचे उत्तर जिल्हा परिषद निवडणूक निकालाने मिळणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिलेल्या या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपा-शिवसेना कितपत मुसंडी मारते याकडेही लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील अंदाजाचा लंबक इकडून तिकडेमुंबईत काय होणार, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आज दिवसभर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत राहिला. विजयाच्या अंदाजाचा लंबक कधी शिवसेना तर कधी भाजपाकडे फिरत होता पण अनेकांच्या मते तो शिवसेनेजवळ येऊन थांबेल. "शिवसेनेला भाजपापेक्षा काही जागा अधिक मिळतील, असा होरा आहे. आम्हाला ८० ते ९० जागा मिळतील, असे भाजपाचे नेते खासगीत सांगत होते. शिवसेनेने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत त्यांना स्वत:ला ११० जागा मिळतील, असा अंदाज असल्याचा संदेश सोशल मीडियात फिरत होता. दानवे मातोश्रीवर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे आज सायंकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. दानवे यांचे आमदारपुत्र संतोष यांचा विवाह २ मार्च रोजी औरंगाबादला होत असून त्याची पत्रिका देण्यासाठी दानवे मातोश्रीवर गेले होते. तथापि, निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे संकेत दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना आधीच स्पष्ट केले.
आज फैसला !
By admin | Published: February 23, 2017 4:30 AM