कसई दोडामार्ग (जि़ सिंधुदुर्ग) : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन धुडकावून लावत तिलारी धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला; मात्र पोलिसांनी अडविल्याने आंदोलनकर्त्यांनी तो स्थगित केला. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांत काहीकाळ झटापटही झाली. यानंतर आंदोलन सुरूच ठेवून शासन निर्णयाची वाट पाहणार व त्यानंतर पुन्हा जलसमाधीचा निर्णय घेऊ, असा इशारा रविवारी आंदोलनकर्त्यांनी दिला. तिलारी प्रकल्पग्रस्तांची वनटाईम सेटलमेंट रक्कम न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी बुधवारपासून ठिय्या दिला आहे. रविवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीसाठी जलसमाधी घेणार, या निर्णयावर ठाम राहिल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दुपारी भेट देऊन चर्चा केली. गोवा राज्यानेवनटाईम सेटलमेंटची तरतूद केलीआहे. महाराष्ट्र शासनाकडे तुमचा प्रस्ताव ठेवला आहे. मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतहोणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेऊन महिन्याच्या आत जीआर काढून रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. दरम्यान, याआधीही केसरकर यांनी आश्वासने दिली होती. त्यामुळे आंदोलनाचे नेते संजय नाईक यांनी आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतला. तत्पूर्वी आंदोलनकर्ते आम्हाला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत जलसमाधी घेण्यासाठी जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना साखळी करून अडवून ठेवले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापटही झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवून जलसमाधीचा निर्णय स्थगित केला, परंतु उद्यापर्यंत शासन निर्णय न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा प्रकल्पग्र्रस्तांचे नेते संजय नाईक यांनी दिला. (वार्ताहर)
जलसमाधीचा निर्णय स्थगित, मात्र आंदोलन सुरूच
By admin | Published: April 20, 2015 2:08 AM