‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:07 AM2024-07-02T08:07:19+5:302024-07-02T08:07:44+5:30

सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. 

Decision within 3 months regarding payment of old pension to 'those' teachers; Ajit Pawar's announcement | ‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

मुंबई - राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सोमवारी दिली. 

या संदर्भातील प्रश्न संजय केळकर (भाजप) यांनी उपस्थित केला होता. बाळासाहेब थोरात, आशिष शेलार यांनी उपप्रश्न विचारले.  अजित पवार म्हणाले की,  १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिराती निघालेल्या व त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारे नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयात केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम-१९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम- १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय निवडण्याचा विकल्प देण्यात आला आहे.

निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्या बाबतीत हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. 

निवृत्त अधिकाऱ्यांची अभ्यास समिती
देशाच्या, इतर राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करून नवीन निवृत्ती वेतन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.  त्यानंतरच्या काळात विविध राज्यांतील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजनाच लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. राज्य शासनानेही केंद्राकडे माहिती मागितली आहे. 
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागणीचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने देखील निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. याबाबत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा केली आहे. 

जुन्या निवृत्ती वेतन संदर्भातील राज्य सरकारच्या भूमिकेबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निवेदन करण्यात आले आहे. काही राज्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातील माहिती देखील मागविली आहे. सरकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पेन्शनबाबत योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

Web Title: Decision within 3 months regarding payment of old pension to 'those' teachers; Ajit Pawar's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.