नागपूर : राज्याचे महाधिवक्ता शीहरी अणे यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास शक्य नाही अशा आशयाचे वक्तव्य ६ डिसेंबरला केले आहे. त्यांनी राज्याचे महाधिवक्ता म्हणून शपथ घेतलेली असल्याने त्यांना कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक मत व्यक्त करता येत नाही. त्यामुळे त्यांना पदमुक्त करा अशी मागणी काँग्रेसचे संजय दत्त व शरद रणपिसे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये प्रस्ताव मांडताना केली.महाधिवक्ता जे बोलतात ते राज्य सरकारचे मत आहे, असे गृहीत धरले जाते. त्यामुळे अणे यांच्या वक्तव्याशी राज्य सरकार सहमत आहे का, राज्याच्या इतिहासात आजवर महाधिवक्ता यांनी वैयक्तिक मत व्यक्त केलेले नाही. परंतु अणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे, ते अशी मागणी कशी काय करू शकतात, असा प्रश्न संजय दत्त यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून शपथ घेतल्यानंतर ते व्यक्तिगत मत व्यक्त करू शकत नाही. पंरतु प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे अणे सांगत आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे शिस्तप्रिय आहे, असे म्हणतात. मग अणे यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. अशा प्रसंगी महाधिवक्ता विदर्भासंदर्भात आपले मत व्यक्त करीत आहे. मला राज्यपालांनी नियुक्त केले असे ते म्हणत आहे. परंतु सरकारने शिफारस केली म्हणूनच ते महाधिवक्ता झाल्याचे सांगत जयंत पाटील यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. (प्रतिनिधी)
महाधिवक्ता अणे यांना पदमुक्त करा
By admin | Published: December 11, 2015 12:35 AM