नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत केली. दरम्यान, उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्धाटन येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या पार्श्वभूमीवर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी मोठी मागणी केली आहे. समस्त हिंदूंना अभिमान वाटावा असा दिवस म्हणजे अयोध्येत राम मंदिराचे उद्धाटन येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी एक निवेदन दिले आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सभागृहामध्ये सुद्धा विनंती केली की, एका वर्षाला एवढ्या सुट्ट्या जाहीर केल्यात त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी २२ जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता येईल, जर आपण सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अशी विनंती केली आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी हजारो भाविक, मान्यवारांच्या उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप मोठा आणि ऐतिहासिक असणार आहे. यामुळेच २२ जानेवारी २०२४ रोजी राज्यासह संपूर्ण देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी अनेक व्यक्तींकडून करण्यात येत आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना आमंत्रणविशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २२ जानेवारीला होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आधीच आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, ट्रस्टने ३००० व्हीव्हीआयपींसह ७००० जणांना आमंत्रण पाठवले आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अधाणी यांचा समावेश आहे. याशिवाय, 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नावाचा समावेश आहे.