चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा; अमित शहांचा काँग्रेसवर हल्ला
By appasaheb.patil | Published: September 1, 2019 09:16 PM2019-09-01T21:16:29+5:302019-09-01T21:19:49+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा सोलापुरात समारोप
सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध आहे की पाठिंबा आहे, याचा खुलासा करावा, असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्याचा समारोप कार्यक्रम सोलापुरात आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी अमित शहा बोलत होेते़ यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री अमित शहा, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, संभाजी पाटील-निलंगेकर, विनोद तावडे, अशिष शेलार यांच्यासह आदी केंद्र व राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, भाजप विरोधात असताना जेव्हा जेव्हा देशाचा विषय आला त्या त्या वेळी भाजपाने काँग्रेस सरकारला समर्थन देण्याचे काम केले़ आता देशात भाजपाची सत्ता आहे़ भाजपाचे मागील पाच वर्षात देशात विकासाची गंगा आणली़ जातीपातीचे राजकारण न करता विकासाभिुमख काम केले़ जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिताचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेते. चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा, असा हल्लाही शहा यांनी केला.
सोलापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवत केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची जंत्रीच सादर केली. ३७० कलम हटविल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात निवडणुका होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचं आवाहनही शहा यांनी केलं.