जमीर काझी मुंबई : राज्य पोलीस दलातील अति वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्यांबाबत सध्या पोलीस वर्तुळात चर्चा सुरू असून, उपनिरीक्षक ते उपअधीक्षक दर्जापर्यंतच्या अधिका-यांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांच्या (जीटी) कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एका घटकातील कालावधी पूर्ण झालेले आणि मुदतपूर्व बदलीसाठी, तसेच इच्छुक ठिकाणासाठी ‘फिल्डिंग’ लावणाºया अधिकाºयांसाठी एक धोक्याची सूचना आहे. त्यांना या कामासाठी राज्य मुख्यालयात प्रवेशाला मज्जाव घालण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाºयांना भेटण्यासाठी त्यांनी मुख्यालयात येऊ नये, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत.संबंधित पोलीस घटकप्रमुखांमार्फत आलेल्या अर्ज, प्रस्तावावर पोलीस महासंचालक कार्यालयातून निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, झालेली बदली रद्द करण्यासाठी पहिल्यांदा संबंधित ठिकाणी हजर झाल्यानंतर अर्ज करावे, त्याशिवाय त्याचा विचार केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिलच्या मध्यापासून बदल्यांचे आदेश जारी केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.३१ मेपूर्वी सर्वसाधारण बदल्या करण्याचे आदेश असल्याने महासंचालक कार्यालयाकडून उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाºयांच्या बदल्या व बढतीसाठीचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून त्यासंबंधीची यादी व प्रस्ताव मागविण्याचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे, उपअधीक्षक ते अधीक्षकापर्यंतच्या बदल्या व बढत्या गृहविभागाकडून केल्या जात असल्या, तरी त्याचे प्रस्ताव पोलीस मुख्यालयातून पाठविले जात असल्याने, त्याची ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक ठिकाणी बदलीची ‘फिल्डिंग’ लावण्यासाठी संबंधित अधिकारी मुख्यालयात गर्दी करतात. परिणामी, कार्यरत असलेल्या ठिकाणच्या कामाकडे दुुर्लक्ष होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.बदलीबाबतचे पूर्वीचे अर्ज रद्दपोलीस अधिकाºयांनी बदलीसाठी पाठविलेले सर्व विनंती अर्ज रद्द करण्यात आले असून, २ फेब्रुवारीनंतरचे अर्ज विचारात घेतले जातील. परिणामी, अर्ज केलेल्या अधिकाºयांनी आता संबंधित घटकप्रमुखाच्या शिफारशीनिशी नव्याने अर्ज पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.येत्या काही दिवसांमध्ये अपर पोलीस महासंचालक, विशेष महानिरीक्षक व उपमहानिरीक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्याबाबतच्या यादीवर अंतिम हात फिरविला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, त्याबाबतचे आदेश जारी केले जाणार आहेत. मुंबईतील सहआयुक्त अर्चना त्यागी, क्राइम बॅँचचे संजय सक्सेना, पोलीस मुख्यालयातील प्रभात कुमार, प्रशांत बुरडे आदींना अपर महासंचालक पदी बढती दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. मुंबईच्या दत्ता पडसलगीकर यांची वर्णी गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या एसीबी महासंचालक पदी लागण्याची शक्यता असून, त्यांच्या जागी सुरक्षा महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बर्वे, ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबईतील आयुक्त पदासाठी अधिकाºयांमध्ये चढाओढ सुरू आहे.इच्छुक ठिकाणी बदली न झाल्यास बहुतांश अधिकारी त्या ठिकाणी हजर न होता, परस्पर अन्यत्र बदली करून घेतात. ही पद्धत चुकीची असून, संबंधित अधिकाºयांनी आता पहिल्यांदा बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे. त्यानंतर, त्यांच्या अडचणी व समस्येबाबत संबंधित घटकप्रमुखाच्या शिफारशीनिशी त्यांनी अर्ज पाठविल्यानंतर, त्याबाबत अस्थापना मंडळांकडून विचार केला जाईल. - सतीश माथूर (पोलीस महासंचालक)
बदली कामासाठी पोलीस मुख्यालयात ‘नो एन्ट्री’!, डीजींचे अधिका-यांना फर्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:02 AM