पुणे : पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच असून, मार्च २०१६मध्ये प्रवाशांची संख्या तब्बल ७० हजारांनी घटली असतानाच; एप्रिल महिन्यातही हा टे्रंड कायम असून प्रवासीसंख्या ४१ हजारांनी घटली आहे. फेब्रुवारीत असलेली १० लाख ८० हजार प्रवासीसंख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजांरांवर खाली आली होती. हा आकडा एप्रिल २०१६मध्ये ९ लाख ६९ हजारांवर आला आहे. त्यामुळे एकीकडे अवघ्या दोन महिन्यांत प्रवासीसंख्या तब्बल १ लाख १० हजारांनी घटली असताना; दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असल्याच्या नावाखाली नवीन गाड्या खरेदीचा घाट घालण्यात आला असून, त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २००९ ते २०१५ दरम्यान १० लाखांच्या आसपास राहिली आहे. मात्र, याच कालावधीत बसची संख्या १५११ वरून २०५४वर गेली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढूनही प्रवासीसंख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, शाळांना असलेल्या सुट्या तसेच इतर कारणास्तव मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत पीएमपीच्या प्रवाशांची संख्या कमी होते. मात्र, या वेळी ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असतानाही ती वाढविण्यासाठी अथवा प्रवासी घटल्याने मार्गावरील गाड्यांचे नियोजन करण्यासाठी पीएमपीकडून कोणतेही विशेष प्रयत्न करण्यात आले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. तर, सद्य:स्थितीत मार्गावर नसलेल्या ९४८ बसपैकी जवळपास १११ बस या भाडेकरारावरील ठेकेदारांच्या असून, त्या मार्गावर नसल्याने प्रतिबस १० हजार रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या ठेकेदारांना समज देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच बस प्रवासी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. >अवघ्या ५९ टक्के बस रस्त्यावर प्रवाशांची संख्या घटण्याबरोबरच पीएमपीच्या ताफ्यात पीएमपी, पीपीपी तत्त्वावरील बस तसेच ठेकेदारांच्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या बसमधील केवळ ५९ टक्केच बस या दोन महिन्यांत रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २१०० बस असून, त्यातील केवळ ११०० बसच या महिन्यांमध्ये रस्त्यांवर उतरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ताफ्यातील बसही पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणण्यात पीएमपीला अपयश येत असून, प्रवाशांना सक्षम सुविधा मिळणे धूसर होत असल्याची टीका मंचाने केली आहे.>मार्गावर नसलेल्या ९४८ बसपैकी सुमरे १११ बस या भाडेकरारावरील ठेकेदारांच्या असून, त्या बस मार्गावर नसल्याने प्रतिबस १० हजार रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहे.
पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच
By admin | Published: June 11, 2016 1:13 AM