मुंबई : अभियांत्रिकीच्या डिप्लोमा २०१५-१६ शैक्षणिक वर्षाच्या आॅनलाइन प्रवेशाच्या २ हजारांहून अधिक जागांत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडे वाढत्या ओढ्यामुळे अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीही डिप्लोमाच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे निदर्शनास आले होते. याउलट ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही कला शाखेकडे वळले. गतवर्षी अभियांत्रिकी डिप्लोमाच्या एकूण १ लाख ८१ हजार ९१२ जागांपैकी केवळ १ लाख ४ हजार ६६५ जागांवरच प्रवेश घेण्यात आले. त्यात ७७ हजार २४७ म्हणजेच ४२.४६ टक्के जागा रिक्त होत्या. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थाचालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती.या वर्षी डिप्लोमासाठी एकूण १ हजार ८३० जागा नव्याने निर्माण झाल्या. त्यामुळे संस्थाचालकांमध्ये आशेचे वातावरण होते. मात्र एकीकडे जागांत वाढ झाल्यानंतर दुसरीकडे २ हजार ६७२ जागांची घट झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या जागा आणि कमी झालेल्या जागांची तुलना केल्यानंतरही ८४२ जागा कमीच झाल्याचे निदर्शनास येते. परिणामी, या वर्षी एकूण १ लाख ८१ हजार ७० जागा प्रवेशासाठी उपलब्ध असतील.
अभियांत्रिकी डिप्लोमाच्या जागांत घट
By admin | Published: June 13, 2015 3:37 AM