बेळगाव : एका व्यक्तीच्या घरवापसीमुळे शत्रूंची संख्या एकाने कमी होते आणि एका हिंदू व्यक्तीच्या दुसऱ्या धर्मात होणाऱ्या धर्मांतरामुळे शत्रंूच्या लोकसंख्येत एकाने वाढ होते, असे खळबळजनक वक्तव्य गोरक्ष पीठाचे महंत, खासदार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजच्या मैदानात विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची वेळ आली आहे. अखंड हिंदू राष्ट्राचा उद्देश पूर्ण झाला नाही. त्याला कारण जातीवर आधारित भेदभाव आणि अस्पृश्यता हेच आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भेदभाव आणि अस्पृश्यता याला तिलांजली देणे आवश्यक आहे. ‘घरवापसी’वर बोलताना आदित्यनाथ म्हणाले, परकीय सत्ता असताना परकीयांच्या आक्रमणामुळे मोठ्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर झाले असून, आता त्यांना गुदमरल्यासारखे होत असून, त्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचे आहे. आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. पाकिस्तानात शिया-सुन्नी संघर्षात अनेकांचे बळी गेले आहेत. भारतातील मुस्लिम सुरक्षित आणि शांततापूर्ण जीवन जगत आहेत, त्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माची सहिष्णुता आहे. गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतीक असल्यामुळे गोहत्या बंदी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.बेळगावमधील पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे एजंट बनले असल्याचा आरोप करीत आदित्यनाथ म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठीच कर्नाटकात हिंदूंविरोधी कृत्य करीत आहेत. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी सचिव गोपाळ भट, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचीही भाषणे झाली. यावेळी स्वागत समितीचे अध्यक्ष खासदार प्रभाकर कोरे, खासदार सुरेश अंगडी यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदींचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एका व्यक्तीच्या घरवापसीने शत्रूंच्या संख्येत घट : आदित्यनाथ
By admin | Published: March 02, 2015 12:18 AM