अकोला : पावसाळ्याच्या सुरुवातीला धो-धो बरसलेल्या पावसाने एक महिना दडी दिली. त्यामुळे कृषिपंपांचा वाढलेला वापर आणि हवामान बदलामुळे उष्णतामान वाढून, केवळ १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३000 ते ३५00 मेगा वॉटने वाढ झाली आहे. दुसरीकडे निर्मितीतही घट आली आहे. परिणामी मागणी व पुरवठय़ात तफावत निर्माण झाल्याने राज्यात अघोषित भारनियमनाला सुरुवात झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी असलेली राज्याची १३५00 ते १४000 मे. वॉ. विजेची मागणी वाढून १६000 ते १६,५00 मे.वॉ. एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात काही तास अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. महानिर्मितीचे परळी येथील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ५५00 मे.वॉ. अपेक्षित असली तरी, प्रत्यक्षात केवळ ३८00 मे. वॉ. पर्यंत वीज उपलब्ध होत आहे. पवन ऊज्रेतूनही १८00 ते २२00 मे. वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ १000 मे.वॉ. पर्यंत मिळत आहे. तिरोडा येथील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ (६६0 मे. वॉ.) आणि अमरावती येथील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे राज्यात प्रथमच मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता जी- १, जी- २ आणि जी-३ या गटात भारनियमन करण्यात आले. केंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही फ्रिक्वेन्सीमध्ये तफावत येत असल्याने आज इतर गटातही भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्स्चेंजमधून १ हजार ते १२00 मे. वॉ. वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. कोयना येथील २५0 मे.वॉ.चा संच सुरू झाल्यामुळे विजेची उपलब्धता वाढल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्वच गटातील भारनियमन कमी करण्यात आले.
*कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीतच
विजेचा तुटवडा निर्माण होत असला तरी, सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन महावितरणने कृषिपंपाचे भारनियमन न करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिपंपांना निर्धारित तासांचा वीजपुरवठा करण्यात येत आहे.