लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निकृष्ट दर्जाच्या गणवेशासाठी अवास्तव शुल्क आकारणाऱ्या चरई येथील श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेच्या विराधात पालकांनी एकजूट केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने गणवेशाच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. सभेमध्ये पालकांनी याला संमती दिली असल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.ठाण्यातील चरई येथे आयोजित पालक सभेमध्ये हायस्कूलच्या व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुती कापडाच्या गणवेशखरेदीबाबत माहिती दिली होती. प्रत्यक्षात विक्रीला सुरुवात झाली, तेव्हा गणवेशाचे कापड सुती नव्हे, तर टेरिकॉटमिश्रित असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. बाजारपेठेत ५०० ते ७०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या या गणवेशासाठी १२०० ते १५०० रुपये मोजावे लागत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून, पालक आणि व्यवस्थापनात चांगलीच जुंपली. गणवेशासाठी जाड कापड वापरल्यास तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे कापडाची गुणवत्ता बदलण्याचा आणि गुणवत्तेबाबत पालकांची तक्रार आल्यास पूर्णत: निरसन करण्याची हमी कंत्राटदाराने दिली आहे. मोज्याच्या शुल्क आकारणीवरही पालकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर, मोज्याची किंमत चुकीची सांगण्यात आली होती, अशी भूमिका घेऊन कंत्राटदाराने घूमजाव केले आहे. बैठकीच्या नोंदीची प्रत शाळा व्यवस्थापनाने प्रसारमाध्यमांना पुरवली असून नोंदीसोबत जोडलेल्या दुसऱ्या कागदावर पालकांच्या सह्या आहेत. व्यवस्थापन आणि पालकांच्या गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडल्याचा दावा शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विश्वस्त मंडळाने केला आहे. >मंगळवारी सकाळी ९ वाजता या मुद्यावर शाळा व्यवस्थापन आणि पालक-शिक्षक संघटनेच्या सदस्यांची संयुक्त बैठक शाळेत पार पडली. या बैठकीमध्ये गणवेश शुल्क इयत्तांऐवजी गणवेशाच्या आकारानुसार घेण्याचे ठरवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या गणवेश शुल्कात घट
By admin | Published: June 08, 2017 3:43 AM