पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पडलेल्या दुष्काळाचे सावट साखरेच्या उत्पादनावर दिसू लागले आहे. यंदाच्या हंगामात मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ७६ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी याच कालावधीत ८२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. जी यंदाच्या तुलनेत ६ लाख टनाने कमी आहे. जास्त पाण्यावर येणारे पिक म्हणून ऊस ओळखला जातो. मात्र गेल्या २ वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. गतवर्षी तर हे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ऊसाच्या पिकावर पहायला मिळात आहे. गतवर्षी मार्चच्या मध्यापर्यंत ७३२ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते आणि त्यातून ८२ लाख टन साखरचे उत्पादन झाले. यंदा याच कालावधीत ६८२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यातून ११.१३ टक्के साखर उताऱ्याने ७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.या हंगामात राज्यात सहकारी आणि खासगी असे १७७ साखर कारखाने गाळपासाठी सुरू करण्यात आले होते. त्यापैकी ८८ कारखान्यांचे गाळप मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण झाल्याने ते बंद करण्यात आले आहेत. नांदेड विभागातील २५ कारखाने, पुणे विभागातील ३३ कारखाने बंद झाले आहेत. औरंगाबाद, अहमदनगरमधील ५० टक्के कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूरमधील कारखान्यांचे गाळप अजूनही चालू आहे. तेथे ३८ कारखाने सुरू असून त्यापैकी केवळ एकाचेच गाळप पूर्ण झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम जून महिन्यापर्यंत चालेल पण १५ एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखान्यांचे गाळप पूर्ण होण्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)७८ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेतयंदाचा गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर पोहोचलेला असताना अजूनही ७८ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. साखर आयुक्त कार्यालयाने काढलेल्या अंदाजावरून यावर्षी ७६० लाख टन ऊस गाळपासाठी येणार आहे. त्यापैकी ६८२ लाख टन ऊसाचे गाळप मार्चच्या मध्यापर्यंत झाले आहे.
दुष्काळामुळे साखर उत्पादनात घट
By admin | Published: March 18, 2016 2:32 AM