पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन (डी.एल.एड्) अर्थात डी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच आॅनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. परिषदेतर्फे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या ९ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास उपलब्ध होणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी विविध महाविद्यालयांत जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु, आता घरी बसूनच विद्यार्थी आॅनलाइन पद्धतीने डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज भरू शकणार आहेत. गेल्या वर्षी १ हजार १ महाविद्यालयांमधील ६६ हजार ६८३ जागांसाठी आॅफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यातील शासकीय कोट्याच्या ४२ हजार ७९९ जागांपैकी केवळ १५ हजार ६५१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मात्र, यंदा सुमारे २७० महाविद्यालयांनी डी.एड. अभ्यासक्रम बंद करत असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेला कळविले आहे. त्यामुळे प्रवेश क्षमतेत घट झाली आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे म्हणाले, की यंदा राज्यातील डी.एड. अभ्यासक्रमाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना येत्या ९ जून ते १५ जून या कालावधीत आॅनलाइन अर्ज भरता येतील. याच कालावधीत डाएट स्तरावर कागदपत्रांची तपासणी करता येईल. २६ ते २८ जून या कालावधीत चेकलिस्ट कम मेरिटलिस्ट प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २९ ते ३० या कालावधीत संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. प्रथम प्रवेश फेरी १ जुलैपासून ५ जुलैपर्यंत जाहीर केली जाईल. पहिल्या यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ५ ते ९ जुलै या कालावधीत प्रत्यक्ष अध्यापक विद्यालयात जाऊन प्रवेश घेता येईल. आवश्यकता भासल्यास द्वितीय फेरी घेतली जाईल.
डी.एड. प्रवेश ९ जूनपासून
By admin | Published: May 31, 2016 2:15 AM