मुंबई : दहशतवादी हल्ले, हत्या आणि बलात्काराच्या केससमध्ये आत्तापर्यंत ३८ जणांना फाशी आणि ६२८ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराबाबत तपास यंत्रणा आणि निर्भीड साक्षीदारांचे आभार मानत अॅड. निकम यांनी हा पुरस्कार त्यांच्या आई-वडिलांना समर्पित केला आहे. आपल्या आई-वडिलांमधील धाडस आणि शिस्त हे गुण आपल्याला वकिली व्यवसायात अत्यंत उपयोगी ठरले, अशी प्रतिक्रिया अॅड. निकम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपल्या केसची सुरुवात व अंत संस्कृत श्लोक म्हणून करणाऱ्या निकम यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमन आणि २६/११ च्या खटल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात मोलाची भूमिका बजावली. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही या दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. या दोन्ही केसमध्ये सामान्य जनतेला न्याय मिळाला. त्यांनी या केसेसमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित केला. ‘हा क्षण आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. देशातील १२५ कोटी जनतेशी मी जोडला गेलो आहे. कायद्याचा अदब न ठेवणाऱ्याला धडा शिकवण्याचा व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचा निश्चय या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाला आहे,’ असेही अॅड. निकम म्हणाले.अॅड. निकम यांनी हा पुरस्कार त्यांच्या आई-वडिलांना समर्पित केला आहे. ‘माझे वडील साने गुरुजींच्या सान्निध्यात शिकले. त्यामुळे त्यांच्या अंगी कडक शिस्त होती, तर आई क्रांतिवीर सिंह नाना पाटील आणि नागनाथ नायकवडी यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती. त्यामुळे तिच्या अंगी असलेला धाडसीपणा, तर वडिलांची शिस्तप्रियता मला माझ्या वकिली व्यवसायात अत्यंत उपयोगी पडली,’ असेही अॅड. निकम नमूद करतात. या पुरस्काराबद्दल अॅड. निकम यांनी भारत सरकार आणिराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ‘याशिवाय निडरपणे न्यायालयात साक्ष देणारे आणि तपास करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची बहुमोल मदत मी विसरू शकतनाही,’ असेही अॅड. निकम यांनी म्हटले. (प्रतिनिधी) मूळचे जळगावचे असलेले उज्ज्वल निकम यांचे वडील देवरावजी निकम कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांच्याकडूनच कायद्याचे धडे घेत उज्ज्वल निकम वकील बनले. जळगावच्या एस. एस. मणियार लॉ कॉलेजमधून १९७७ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. सुरुवातीला ते दिवाणी केसेस हाताळत होते. मात्र, त्यामध्ये त्यांना समाधान मिळाले नाही. त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. च्१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात निकम यांची नियुक्ती विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आली. या घटनेनंतर निकम माध्यमांच्या आणि सामान्य नागरिकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरले. त्यानंतर गुलशन कुमार हत्याप्रकरण, प्रमोद महाजन हत्या, खैरलांजी दलित हत्याकांड, पुण्याचे राठी हत्याप्रकरण, कोल्हापूरचे बाल हत्याकांड, मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशन बलात्कार प्रकरण आणि मुंबईतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी निकम यांनी सरकारची बाजू न्यायालयापुढे भक्कमपणे मांडत आरोपींना धडा शिकवला. च्१९९३ साखळी बॉम्बस्फोट, गेट वे आॅफ इंडिया बॉम्बस्फोट (टिष्ट्वन बॉम्बस्फोट), कल्याण रेल्वे बॉम्बस्फोट आणि मुंबई दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना फासावर चढवून समाजाला न्यायव्यवस्था कणखर असल्याचा संदेश दिला.
आई-वडिलांना पद्मश्री समर्पित
By admin | Published: January 26, 2016 3:16 AM