लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३३२वे वर्ष आहे. या वारीच्या धर्तीवर सोशल मीडियावर सुरू झालेल्या नेटिझन्सच्या व्हर्च्युअल दिंडीनेही आता ७व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा फेसबुक दिंडी ‘ती’ला समर्पित करण्याचे ठरवण्यात आले असून, यात ‘ती’च्या अस्तित्वाचे विविध पैलू उलगडण्यात येतील.गेल्या वर्षी फेसबुक दिंडीने राबविलेल्या ‘पाणी वाचवा’ आणि ‘जलसंधारण’ मोहिमेला समाजातील सर्व स्तरांतून भरभरून प्रतिसाद लाभला. यंदाही फेसबुक दिंडीची चमू आपणासमोर एक अभिनव उपक्रम घेऊन येत आहे. यंदा फेसबुक दिंडी आपल्यासाठी पालखीचे फोटो आणि व्हिडीओ अपडेट्ससोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन येत आहे. यंदा ‘वारी ‘ती’ची’ या मोहिमेंतर्गत गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूणहत्या, बाल लैंगिक अत्याचार, मासिक पाळी समज - गैरसमज, बालविवाह, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, विधवांच्या समस्या, रूढी आणि परंपरांमध्ये अडकलेल्या स्त्रिया, कर्तृत्ववान स्त्रिया, वारकरी संप्रदायातील स्त्री संतांचे कार्य, स्त्री अभिव्यक्ती अशा अनेक मुद्द्यांवर सखोलपणे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या ‘ती’ संकल्पनेवर आधारित मोहिमेचे समाजातील विविध क्षेत्रातील महिलांनी स्वागत केले. त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, क्रांती अग्निहोत्री यांनी फेसबुक दिंडीला शुभेच्छा दिल्या आहेत. या अनोख्या संकल्पनेसाठी फेसबुक दिंडीचे मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओम्कार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, ओम्कार महामुनी रात्रंदिवस झटत आहेत.माहितीपटातून उलगडला प्रवासपंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न सांस्कृतिक ठेव्याचा अविभाज्य घटक आहे. या वारीत काही अपरिहार्य कारणास्तव सहभागी होऊ न शकणाऱ्या ज्येष्ठांसाठी आणि आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असणाऱ्या तरी मनोमन सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांसाठी ‘फेसबुक दिंडी’ २०११ साली सुरू झाली. हा गेल्या सहा वर्षांचा प्रवास यंदा ‘फेसबुक दिंडी - एक प्रवास’ या माहितीपटातून उलगडण्यात आला आहे. स्त्री जीवनाची संघर्षमय ‘वारी’ मांडण्याचा आणि त्यावर संवाद घडवून आणून सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहील. वारी ‘ती’ची या मोहिमेलादेखील नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद द्याल, असा विश्वास असल्याचे फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्निल मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यंदाची फेसबुक दिंडी ‘ती’ला समर्पित
By admin | Published: June 08, 2017 2:39 AM