ऑनलाइन लोकमत/संदीप झिरवाळ
नाशिक/पंचवटी, दि.10 - काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने 500, 1000 रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम मंदिरातील देणगी रक्कमेवर झाला आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या रोडावली आहे. नाशिकला दैनंदिन शेकडो भाविक श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, सितागुंफा, रामकुंड येथे येत असतात. मात्र मागील दोन दिवसांपासून केवळ बोटावर मोजता येतील इतकेच भाविक मंदिरात दिसून येत आहे.
देवदर्शन करण्यासाठी येणारे भाविक मोठया प्रमाणात मंदिरात देणगी देत असतात मात्र दोन दिवसांपूर्वी शासनाने 500, 1000 रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम देणगी रक्कमेवर झाला आहे. नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिर व्यवस्थापनाने भाविकांनी दानपेटीत 500, 1000 रूपयांच्या नोटा टाकू नये असे फलकावर लिहिल्यामुळे एकप्रकारे 500, 1000 ची देणगी स्विकारण्यास नकार दर्शवला आहे. दुसरीकडे श्री काळाराम मंदिरात येणारे भाविक देखील रोख स्वरूपात मंदिरात देणगी पावती फाडत नसल्याने देणगी रक्कमेत घट झाली, असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक, विविध व्यावसायिक व आता तर थेट देवदेवतांच्या देणगी रक्कमेवर झाल्याचे दिसून येत आहे