ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने प्रूडोनोव्हा वॉल्ट प्रकारात थेट अंतिम फेरीत धडक मारुन ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर दीपावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. १४ ऑगस्टला होणा-या अंतिम फेरीसाठी दीपाला शुभेच्छा संदेश दिले जात आहेत. दीपाच्या 'कर्माकर' आडनावामुळे अनेक मराठीजनांचा ती मराठी असल्याचा गैरसमज होत आहे.
कर्माकर हे आडनाव मराठी वाटत असले तरी, दीपा मराठी नसून बंगाली आहे. सोमवारी दीपाने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणा-या मराठी कन्येचे अभिनंदन, रियोमधे मराठी झेंडा रोवला असे संदेश फिरत होते. दीपा मराठी नसून, अजून तिची अंतिम फेरी बाकी आहे. १४ ऑगस्टला अंतिम फेरीचा सामना होईल.
आणखी वाचा
वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत
ऑलिम्पिकमध्ये ५२ वर्षानंतर जिम्नॅस्ट खेळामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी दीपा पहिली भारतीय आहे. तिच्याआधी ११ भारतीय पुरुष जिम्नॅस्टस्नी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन आणि १९६४ मध्ये सहा भारतीय पुरुष जिम्नॅस्ट ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते.
पात्रता फेरीत दीपाने आठवे स्थान मिळवले होते. ईशान्यकडच्या त्रिपुरा या छोटयाशा राज्यातून आलेली दीपा आगरतळा या शहरातून येते. 14.850 गुणासह दीपाने ८ वे स्थान कायम ठेवले. एप्रिल महिन्यात २२ वर्षीय दीपा कर्माकरने एकूण 52.698 पॉईंट्स कमावत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं स्थान नक्की केलं. 2014मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकून दीपा कर्माकरने अगोदरच इतिहास रचला होता. २००७ पासून दीपाने एकूण ७७ मेडल मिळवली असून, त्यात ६७ सुवर्णपदक आहेत.