शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर खोकेवाले असा आरोप केला. यावर गुवाहाटीच्या हॉटेलमधून त्यांचे भाषण पाहणारे एकनाथ शिंदेंचे आमदार संतापले आहेत. दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करताय, बदनामी करताय. एकदिवशी आमदारांचा संयम सुटेल. कायद्यात माफीचा साक्षीदार असतो. मग कळेल कुठे कुठे मोठेच्या मोठे खोके गेले. फ्रीजचा बॉक्स, कार्टुन भरून भरून कुठे काय गेले हे बाहेर पडेल असे प्रत्युत्तर केसरकर यांनी दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज
ज्या अयोध्येला तुम्ही जाता, ती रथयात्रा कोणी अडवली ती माहिती नाही का, ज्याने अडवली त्याच्या पायाशी जाऊन लोटांगन घालता. बदनामी सहन करण्याची मर्यादा असते. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही अजून बोलत नाही आहोत. दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तुमच्याकडेही इतर बोटे असतात असा इशारा केसरकर यांनी दिला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? खोटे बोलून रेटूने नेले जात आहे. तसेच राज्य चालविले जात आहे. पण आता जनता भोळीभाबडी राहिलेली नाही. मी मुख्यमंत्री असतो तर एकालाही आत्महत्या करावी लागली नसती. आत्महत्या करायची नाही. शिवरायांचे नाव घेतो, त्यांनी लढायला शिकविले होते. एका बाजुने लंडनमधून तलवार आणण्यास सांगायचे आणि दुसरीकडे कोश्यारी त्याच शिवाजी महाराजांविरोधात बोलणार. वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करून ठेवावा लागणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. मी ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय. आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही हे जाहीर सांगावं. यांना केवळ नाव बाळासाहेबांचं, चेहरा बाळासाहेबांचा आणि आशीर्वाद मोदींचा तुमची मेहनत कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.