Deepak Kesarkar News: राज्यातील विविध घटनांमुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि नेते दीपक केसरकर यांनी एक मोठा दावा केला आहे. शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापूरची पूरस्थिती टळली, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, कोल्हापुरात पूर परिस्थितीप्रसंगी मी शिर्डीत होतो. राधानगरी धरणातून पाणी सोडले असताना पाणीपातळीत पाच फुटांपर्यंत वाढ होऊन अनेक गावे पाण्याखाली आली असती. पण, मी प्रार्थना सुरू ठेवली, एक फुटानेही पाणीपातळीत वाढ झाली नाही. वाटल्यास तुम्ही पाटबंधारे विभागाकडे चौकशी करा, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
शिवसैनिक घेत असलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले पाहिजे
उद्धव ठाकरे यांच्याकडून होत असलेल्या टीकेबाबत दीपक केसरकर म्हणाले की, सत्ता व पद गेल्याचा त्यांना राग आलेला असावा. बाळासाहेब ठाकरे यांनीही समाजकारण व राजकारणाचे सूत्र सांगितले होते. शंभर टक्के राजकारण त्यांनाही मान्य नव्हते; परंतु उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्यास त्यांना अपमानास्पद वाटते. त्यापेक्षा त्यांनी टीका करणे थांबवावे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसैनिक घेत असलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले पाहिजे, असे प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या विधानावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर बोलताना, त्यांचे वक्तव्य हे वयोमानाचा परिणाम आहे, असे सांगत दीपक केसरकर यांनी यावर अधिक भाष्य केले नाही.