मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंड करत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी शिवसेनेचा वेगळा गट निर्माण केला आहे. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांना १२ खासदारांसह अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी साथ दिली आहे. दरम्यान, या बंडखोरांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र आता दीपक केसरकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दीपक केसरकर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की, मोदींच आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं सुरू होतं. मात्र १२ आमदारांचं निलंबन झाल्यानंतर हे बोलणं थांबलं हे खरं आहे का, या प्रश्नासह मी तीन प्रश्न विचारले होते मात्र मी विचारलेल्या तीन प्रश्नांपैकी एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेषत: शिवसैनिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आज ज्या काही भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण आज जी व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनीच मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून वचन दिलं होतं. मात्र बाळासाहेब दिलेलं आश्वासन पूर्ण करायचं. तुम्ही आश्वासन पूर्ण केलं नाहीत. उलट एकनाथ शिंदेच तुमच्याकडे आले. त्यांनी तुम्हाला सांगितलं की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, मात्र आम्हाला हिंदुत्वासोबत जायचं आहे. त्यावेळी तुम्ही त्यांचं का ऐकला नाहीत. तसेच हिंदुत्वासोबत का गेला नाहीत, असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.
आज या राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याल द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे. २०१४ मध्ये सरकार स्थापन झालं, तेव्हापासून रोज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद व्हायची. रोज दिल्लीवर टीका व्हायची. तरीही आपलं राज्य सुरळीत चालावं, अशी तुमची अपेक्षा होती. ते जे घडत होतं त्याला कोण जबाबदार होता. रोज सकाळी कोण बोलतं हे राज्याला माहिती आहे. ते बोलत असताना ज्या पक्षासोबत राज्य करतोय. त्याच्याशी चांगले संबंध राहिले पाहिजेत. राज्य आणि केंद्राचे संबंध चांगले राहिले पाहिजेत. तर राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो. सामान्यांना दिलासा मिळू शकतो, याचा विचार केला गेला नाही,. असे दीपक केसरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कालपर्यंत तुम्ही सांगत होता की लोकांच्या बांधापर्यंत चला. मात्र आता आपल्या कार्यकर्त्यांना बांधापर्यंत जायला सांगून त्यांना पंचनाम्यामध्ये मदत करायला का सांगत नाही. त्याच्याऐवजी राज्यात राजकारण सुरू आहे. प्रत्येकाला हिणवण्याचं काम सुरू आहे. आमच्या एका खासदारांच्या घरावर मोर्चा काढला. तुम्हाला एखाद्याच्या घरावर जाण्याचा अधिकार कुणी दिला. तुम्हाला वाटलं तर सभा घ्या, जनतेशी बोला. कुणाच्या घरावर चाल करून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आता प्रवक्त्यांची भाषा पुन्हा घसरू लागली आहे. लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे. पक्षप्रमुख आजारी असताना कटकारस्थान झालेलंच नव्हतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहिजे. तुम्हाला भेटून वारंवार आघाडी तोडण्याबाबत सांगितलं होतं, त्यात काही कटकारस्थान होतं का? शिवसेना वाचवण्यासाठी तर ही आघाडी बनता कामा नये. तसेच शिवसेनेचं मुंबई हे हृदय आहे. त्यावेळी तुम्ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी तुम्ही मोदींशी बोलणी का केली नाही. तुमची बोलणी जर महाराष्ट्राच्या सत्तेसाठी असतील तर मग मुंबईचा विचार कुणी करायचा. मुंबईचं अस्तित्व, मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेने टिकवलंय, म्हणून आम्ही शिवसेनेत आलो. आज तुम्ही मुंबईत दिसायला लागलात. शाखांशाखांमध्ये फिरायला लागलात, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला.