मुंबई-
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला जाण्याची शक्यता आहे. याची पूर्ण कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आहे. आता तर कायदेशीर लढाईत आपल्याकडून पक्ष चिन्ह हिरावलं जाऊ शकतं याचीही तयारी उद्धव ठाकरेंनी केलेली दिसत आहे. कारण शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत सूचक विधान केलं आहे. कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्ह गमावावं लागल्यास नव्या चिन्हासाठी तयार राहा आणि नवं चिन्ह घरोघरी कसं पोहोचेल याची काळजी घ्या, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी अजूनही वेळ गेलेली नाही आमची उद्धव ठाकरेंना विनवणी आहे की त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी आणि सुवर्णमध्य काढावा, असं म्हटलं आहे.
"वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंबाबत मी काही बोलणार नाही असं याआधीही मी स्पष्ट केलं आहे. वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला तर मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. अमित शाह, नड्डांशी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. काही कारणामुळे जरी दूर गेले असतील तरी जवळ येऊ शकतात. आम्ही आता विधीमंडळात एका गटात आलेले आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. हे काम करत असताना सर्वांनी एका दिशेनं काम करणं महत्वाचं आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय केवळ उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. याबाबतीत मी निश्चितीच आशादायी आहे", असं दिपक केसरकर टीव्ही-९ या वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. तसेच आता पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, कायदेशीर लढाईमध्ये शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते, अशी चिंता उद्धव ठाकरे यांना सतावत आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्वसनीय सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.
"एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह केलेलं बंड आणि त्या प्रक्रियेला न्यायालयीन पातळीवर मिळालेली साथ विचारात घेता आता शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हही काढून घेण्याचा प्रयत्न होईल. आपण कायद्याने जो लढा द्यायचा तो देऊ, मात्र दुर्दैवाने या कायदेशीर लढाईत अपयश आलं तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवं चिन्ह मिळेल. ते कमी कालावधीत घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा", असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.