अनंत जाधव
सावंतवाडी : शिवसेनेचे आमदार शिंदे गटाबरोबर गेल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली असली तरी यामागे केंद्रीय यंत्रणा काम करत असून शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार हे या यंत्रणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. यातून आमदार दीपक केसरकर हे ही सुटले नसून त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा आहे. दरम्यान, याला दीपक केसरकर यांनी दुजोरा दिला आहे. परंतु आम्ही केलेल्या बंडाशी कोणताही संबध नसल्याचा खुलासा ही त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे काही आमदार बंडखोरी करून आसाममधील गुवाहाटी येथे गेले आहेत. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यातील काही आमदार केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं गेले असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. परंतु, आता सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
काही दिवसापूर्वी आपल्या निवासस्थानावर ही नोटीस आली असून त्या नोटीसीचे उत्तर मी दिले आहे. नियमानुसार आयकर हा भरला जातो ती प्रकिया आहे. मात्र ही नोटीस आली असल्याची कबुली केसरकर यांनी दिली आहे.