ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्ये केली, त्याचा निषेध करावासा वाटतो. ज्येष्ठ व्यक्तींकडून माध्यमांतून थोर नेत्यांचा अवमान होणे योग्य नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असे प्रामाणिकपणे मी सांगेन. भिडे ज्या पद्धतीने मोदी यांचे समर्थन करत आहेत, त्यामुळे फडणवीस आणि पोलीस कारवाई करत नाहीत असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
दीपक केसरकर बोलका पोपट आहे. बेताल वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. त्यांनी सावंतवाडीमध्ये उभे राहावे, डिपॉझिट जप्त करू. केवळ मंत्रीपदाच्या लालसेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बेईमानी करणे आणि ज्याच्यासोबत लाचारी केली त्यांचे गुणगान गायचे हा त्यांचा धंदा आहे. उपकार कर्त्याचे उपकार अपकाराने कसे फेडावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपक केसरकर असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
भाजपाच्या नेतृत्वाला सद्बुद्धी दे, अशा प्रकारची मणिपूरबाबत पण प्रार्थना करावी. केसरकरांनी त्यांच्या मतदारसंघातील गावे बुडू नये म्हणून पण प्रार्थना करावी. माझ्या प्रार्थनेमुळे कोल्हापूरला पूर आला नाही असं सांगण्याचा मूर्खपणा केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो, इतर कोणी नाही अशी टीकाही राऊत यांनी केली.
सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा पक्षात घेण्यात येईल पण बेईमानी करून जे खासदार, आमदार गेले आहेत त्यांना मातोश्रीचे दरवाजे कदापि उघडले जाणार नाहीत असे उद्धव ठाकरेंनी ठरविले असल्याचे राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने गद्दार गटातून काही जणांना भुंकण्यासाठी ठेवले आहे. त्यातले हे संभाजीनगरचे आणि कणकवलीचे दुसरे एक. मंत्रीमंडळाची वाट आपली सुकर करायची, असा प्रयत्न आहे. संजय शिरसाठ यांनी दोन वर्षांपूर्वी का पक्षप्रमुखांना सांगितले नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 30 जागा जिंकेल. कल्याण मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहे, त्यांना देखील तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे. इतर ठिकाणी दोन किंवा चार विद्यमान खासदार सोडले तरी इतरांना तिकीट देखील मिळणार नाहीय असे काल जाहीर झालेल्या ओपिनिअन पोलवर राऊत म्हणाले.