केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. दोघेही एकमेकांवर केलेल्या उपकारांची माहिती वेळोवेळी देत असतात. अशातच आता दोन्ही नेते एकमेकांसोबत सत्तेत आले आहेत. राजकारणाची वाटचाल कशी विचित्र असते ते या दोघांवरून लक्षात येईल.
आता एकनाथ शिंदे गटात मंत्री असलेले केसरकर पूर्वी राष्ट्रवादीत होते. सावंतवाडीचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीतून आमदार झाले. तेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते. शरद पवार राणेंच्या खासदार पुत्रासाठी सावंतवाडीत आले होते, तेव्हा केसरकरांची नाराजी दूर करण्यासाठी पवार त्यांच्या घरी गेले होते. परंतू, केसरकर राणेंच्या प्रचारसभेत पवारांसोबत गेलेच नाहीत. जिल्हा परिषदेची बैठक असो की आणखी कसली, राणे केसरकर वाद सुरुच होता. केसरकर राणेंच्या राजकारणाला दहशतवादाची उपमा देत असत. त्यावरच सारे राजकारण सुरु होते.
राणे काँग्रेसमध्ये असताना केसरकर शिवसेनेत गेले आमदार झाले. फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. त्यांच्याविरोधात राणेंचाच एकेकाळचा शिलेदार भाजपात जाऊन सावंतवाडी मतदारसंघात शेत नांगरत होता. केसरकरांविरोधात राजन तेलींना भाजपाने उमेदवारी दिली. तेवढ्यात राणे देखील भाजपात डेरेदाखल झाले होते. राजकारण कसे फिरते आणि फिरवते याचे हे उत्तम उदाहरण...
केसरकर पुन्हा निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात केसरकरांना बाजुलाच ठेवण्यात आले. कारण 'माहित नाही', इकडे शिवसेनेकडून दुसऱ्याच नेत्याला ताकद देण्याचे काम सुरु झाले होते. तेवढ्यात शिंदेंनी बाजी मारली आणि संधीची वाट पाहत असलेले केसरकर शिंदेंना गुवाहाटीला जाऊन मिळाले. शिंदेंचे प्रवक्ते झाल्याने आपोआप प्रकाशझोतात आले, पुढे सरकारमध्ये मंत्री देखील झाले. पण मुळ मुद्दा तसाच राहिला... मतदारसंघ कोणाचे? लोकसभेला राणे त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला पुन्हा उमेदवारी देतील. ते केंद्रात मंत्री आहेत. मग शिवसेनेचा असलेला हा मतदारसंघ शिंदे गटाच्या हातून जाण्याची भीती आता शिंदे गटातील शिवसैनिकांना वाटू लागली आहे.
यातच केसरकरांनी लोकसभा मतदारसंघ कोणाचा यावरून ठिणगी उडविणारे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः उभे राहिल्यास त्यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून प्रचार करणार आणि त्यांना निवडून आणणार असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. आता याचा अर्थ राजकीय मंडळी काढू लागली आहेत. कारण हा मतदारसंघ शिवसेनाचा होता, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांचे नाव लोकसभेसाठी आघाडीवर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचा उमेदवार असणार का शिंदे गटाचा? यावरून आता वाद सुरु होण्याची शक्यता आहे.